सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
महाबळेश्वरमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून; पाचगणी पोलिसांनी २४ तासांत ४ आरोपींना ठोकल्या बेड्या.
पाचगणी, दि. १० : महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत चारही आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
दि. ८ जुलै २०२६ रोजी भोसे, ता. महाबळेश्वर येथील अतिथी व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये अक्षय रमेश जाधव (वय २७, रा. भिगवन, ता. इंदापूर, जि. पुणे) हा आपल्या मित्रांसह मुक्कामी आला होता. रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान दारू पिऊन अक्षयने आरडाओरडा केल्याने मित्रांनी त्याला रूममध्ये ठेवून बाहेरून कडी लावली व वरच्या मजल्यावर गेले.
काही वेळाने मित्र रूमवर आले असता अक्षय रूममध्ये दिसला नाही. शोध घेत असताना रूमच्या खाली काही अंतरावर लोकांची गर्दी व बॅटरीचा उजेड दिसला. तिथे गेले असता अक्षय जाधव यास गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
जुन्या वादातून खून
अक्षयने आरोपी सूर्यकांत चंद्रकांत गोळे याच्या राहत्या घरात डोकावून पाहिल्याचा राग मनात धरून सूर्यकांत गोळे (वय ३७, रा. भोसे खिंड), अविनाश सतिश भोसले (वय ३१, रा. बावधन), राहुल जनार्दन राजपुरे (वय ३७, रा. कणुर) आणि अमोल गेणदेव वाडकर (वय ३६, रा. चिखली) या चौघांनी अक्षयला हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी अक्षयला प्रथम पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर पुण्यातील डॉ. बोके हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
२४ तासांत आरोपी गजाआड
या घटनेबाबत मयताचा मित्र विशाल अजित जाधव (वय ३०) याने दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात दि. ९ जुलै २०२६ रोजी गु.र.नं. १९२/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ७ तासांत चारही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना दि. १० जुलै २०२६ रोजी महाबळेश्वर न्यायालयात हजर केले असता दि. १४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस पथकाचे कौतुक
या कारवाईत पो.हवा. श्रीकांत कांबळे, पो.हवा. संदीप मांढरे, पो.हवा. प्रविण कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पाचगणी पोलिसांच्या जलद व अचूक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस करत आहेत.

Post a Comment
0 Comments