Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, राज्य निवडणूक आयोगाची लगबग सुरू..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, राज्य निवडणूक आयोगाची लगबग सुरू..


महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा मोठी धुळवड उडणार आहे. राज्यातील तब्बल १५ हजार १५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी प्रभाग निहाय मतदार यादीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला असून, ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊन सप्टेंबर महिन्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

गावच्या कुस्तीचा फड रंगणार

गावची निवडणूक म्हणजे कुस्तीच्या फडाचा आखाडाच असतो. या निवडणुकीत होसे, नवसे आणि गवसे अशा सर्वच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी ठेवली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गावांमध्ये प्रशासक राज सुरू होता. आता अखेर ग्रामीण भागातील या कुस्तीचा फड रंगणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

निवडणूक आयोगाचे आदेश काय आहेत?

राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राज्यातील बिगर आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत सन २०२४-२५ मध्ये संपलेली आहे आणि ज्या ग्रामपंचायतींची मुदत सन २०२६ मध्ये संपणार आहे, अशा सर्व ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.


मतदार यादीचा कार्यक्रम असा असेल :

• प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : २४ जुलै • हरकती व सूचना दाखल करणे : २४ जुलै ते २९ जुलै • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ४ ऑगस्ट 

४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केव्हाही निवडणूक घोषित करू शकतो. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या EVM मशीन दाखल

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन ईव्हीएम मशीन मागवल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्याला नव्या ईव्हीएमच्या वितरणामध्ये तीन हजार पाचशे मशीनचे युनिट देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात निवडणुकीची लगबग सुरू होणार असून मतदारांची मज्जाच मज्जा राहणार आहे.


परंतु, या निमित्ताने एक महत्त्वाचे आवाहनही करण्यात येत आहे. सामान्य मतदारांनी नंतर रडत बसण्यापेक्षा आताच विचार करून आपल्या गावचा विकास करू शकेल, सर्व समाजातील लोकांना घेऊन चालणारा, गावचं नाव तालुक्यात उज्वल करेल अशा सर्वगुण संपन्न उमेदवारांना निवडून द्यावे. पाचशे ते हजार रुपयांसाठी 'नोट दो, वोट लो' करून मत विकू नये, म्हणजेच गावच्या विकासासाठी ते पुरेसे ठरेल.

Post a Comment

0 Comments