Type Here to Get Search Results !

फलटण येथील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेला महाजनसागर

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

फलटण येथील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेला महाजनसागर.


 फलटण येथील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेने आज पर्यंतच्या फलटणच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले. 


 दि.२९-४-२४ रोजी फलटण येथील गजानन चौकामध्ये महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले

फलटण तालुक्यात मी अनेकदा विविध कार्यक्रमासाठी आलो. फलटणचा अनेक वर्षांचा अनुभव माझ्यासारख्याला आहे. पण आज पहिल्यांदा रघुनाथराजेंचे भाषण ऐकल्यानंतर मला धक्का बसला की सईबाईंचे ऐतिहासिक फलटण स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनात समजावा यासाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा श्वास चालेपर्यंत केली त्या मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या फलटणविषयी एक आदर आणि आस्था आमच्या मनात होते. फलटण आणि परिसरातील अनेक लोक मोठ्या संकटाचा सामना करतायंत, हे याठिकाणी लक्षात आले.



सत्ता येते पण ती लोकांसाठी वापरायची असते. त्या सत्तेकडे जमिनीवर पाय ठेवून बघायचे असते. सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ते पायसुद्धा जागेवर राहत नाही. डोक्यात शिरलेली सत्ता चुकीचा रस्ता दाखवल्यानंतर सत्तेवर बसवणारा जो घटक आहे, सामान्य नागरिक, तो सहन करतो. पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असते. ज्यादिवशी त्या मर्यादेचे उल्लंघन होते, त्यावेळी ज्यांच्या डोक्यात सत्ता शिरलीये, त्यांना योग्य जागा दाखवण्याचे काम सामान्य माणूस करतो. त्यामुळे याठिकाणी जे दुखणे मांडले गेले त्याची नोंद आपण घेऊया आणि दृष्टीने लोकांची सुटका कशी होईल याची काळजी घेऊया.


या भागात साखर कारखानदारी उभी केली. पाण्याच्या क्षेत्रात अनेक काम केली. जे काही योगदान दिले गेले ते फलटणपूरते सीमित नव्हते. मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील सहकारी संस्थेच्या संचालक मंडळात असत. या भागात कारखानदारी उभी करण्यासाठी बारामती भागातील जी शेतकरी समाजातील नेतृत्व करणारी मंडळी होती त्यात माझे वडील, दादासाहेब शिरळकर, साहेबराव जाचक, माणिकराव जाचक, निंबाळकर, जगताप अशा अनेकांची नावे घेता येतील. त्याकाळातील पिढीमध्ये नेहमी चर्चा असायची की निव्वळ ऊसाची शेती करून चालणार नाही, तर कारखानदारी उभी राहिली पाहिजे. कारखानदारी उभी करण्यासाठी महाराज साहेबांचा आशिर्वाद पाहिजे. त्यासाठी आमचे सर्व ज्येष्ठ वडीलधारी फलटणला येऊन महाराज साहेबांना भेटत असत. त्यांची मदत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने, आशिर्वादाने ती कारखानदारी उभी राहिली.


इतरांसाठी काम करणारे हे फलटण, फलटणकर, फलटण संस्थान आणि तिथले नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही याकडे बघायचो. त्याच फलटणमध्ये आज काही वेगळं चित्र दिसतंय. त्यात सत्तेचा गैरवापर होतोय हे स्पष्ट याठिकाणी रघुनाथराजेंचे भाषण ऐकल्यावर झालं.


सत्ता असो वा नसो, लोकांना यातना द्यायचे काम कोणीही करत असेल आणि ते कोणत्याही पदावर करत असतील, तर अशांना ऐकत असल्यास योग्य प्रकारचे मार्गदर्शन आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची वेळ आता आलीये. तुम्ही फलटणकर एकटे नाहीत तर आम्ही बारामतीकर तुमच्या पाठीशी अखंडपणे राहू. फलटणी विकासाची कामे, राजकीय कामे, किंवा अन्य कामांना आमची मदत तुमच्यासाठी आहे. गेले काही वर्षे आपण एकत्र काम करतोय. माझ्याकडे राज्याची जबाबदारी आल्यानंतर हा कारभार चालवताना आजूबाजूच्या सहकाऱ्यांचं सहकार्य लागत होते. सोलापूरमधून विजयदादा, साताऱ्यातून रामराजेंची साथ होती. त्यांचे वैशिष्ट्य होते, की मूलभूत प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या प्रश्नांची सोडवणूक करायची. यासाठी रामराजे असो, संजीवराजे असो त्या सगळ्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे या भागाचा चेहरा बदलण्याची स्थिती झाली.


देशाचे प्रधानमंत्री आज साताऱ्यात येऊन गेले. अपेक्षा होती की राज्याचे नेतृत्व ज्यांनी केले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत आयुष्याचा काळ ज्यांनी दिला, देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर आपले कर्तृत्व दाखवण्याचे काम ज्या महान नेत्याने केले, त्यांच्याप्रती प्रधानमंत्री समाधीचे दर्शन घेतील किंवा देशासाठी योगदान देणाऱ्यांचा आदरयुक्त उल्लेख करतील. पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत. राज्य हे लोकांसाठी चालवायचे असते, ते कशा पद्धतीने चालवायचे याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो. तो याठिकाणी केला गेला नाही. यशवंतरावांचे नाव प्रधानमंत्र्यांनी घेतले नाही, यातून चव्हाण साहेबांची अप्रतिष्ठा होत नाही. तर अशा महामानवाकडे दुर्लक्ष जी व्यक्ती करते तिच्यासंबंधी चर्चा अनुकूल होऊ शकते.


एक काळ असा होता की नेतृत्व कोणत्याही पक्षाचे असो, त्यांचा सन्मान व्हायचा. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडा, पण मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वापरायची असते याचेही स्मरण त्यांना राहिलेले नाही. साहजिकच आपल्याला या गोष्टीचा निकाल घ्यावा लागेल. लोकशाहीत लोकशाही पद्धती टिकेल याकडे पहिल्यांदा लक्ष घालावे लागते. दोन दोन वर्षे निवडणुकाच होत नाही. लोकांना निर्णय घ्यायचा अधिकारच त्यांना गाजवता येत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे हळूहळू आपण वेगळ्या रस्त्याला जायला लागलोय. आज जिल्हा, तालुकापातळीच्या निवडणुका थांबल्या, आणखी काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबतील. त्याचा परिणाम संविधानावर होईल.


स्वातंत्र्यानंतर फलटण राज्य हे संपूर्ण निंबाळकर कुटुंबियांच्या हातात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे, हा दृष्टीकोन मान्य केला आणि संस्थानाची साधनसंपत्ती, संस्थानाचा अधिकार हा सरकारला देऊन टाकला. हा फलटणचा इतिहास आहे. हा इतिहास नजरेसमोर ठेवून लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचे काम जे करू पाहात आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्यासाठी ही निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी धैर्यशीलला निवडणुकीत उभे केले आहे. त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईल. या सगळ्याची सामुहिक शक्ती ही संसदेत गेली, तर या देशाच्या घटनेला कोणीही हात लावू शकणार नाही. एवढी ताकद या तरूणामध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन द्या.


मी पार्लमेंटमध्ये आहे. अजूनही माझा काळ आहे. धैर्यशील मोहितेंच्या मतदरासंघातील कोणताही प्रश्न असो, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांना काही अडचण आली तर दिल्लीत त्यांच्या कुटूंबाचा घटक म्हणून त्यांच्या पाठिशी मी कायम राहीन. त्यांच्यामार्फत तुमची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आधार देईन, हा विश्वास देतो.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments