सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शिरूर लोकसभा मतदार संघात श्री.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ -शरदचंद्रजी पवार साहेब....
महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर, जुन्नर येथे आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजच्या मिरवणुकीसाठी आपण आलात, ज्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण आलो ते डॉ. अमोल कोल्हे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आप आणि अन्य सगळे पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे सहकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू-भगिनींनो..!
अनेकदा मी जिल्ह्यामध्ये येऊन गेलो. मी पहिल्यांदा आलो त्याची आठवण मी काढत होतो. तुम्हाला गंमत वाटेल, १९६० साली मी पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत होतो, यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल प्रचंड आदर आम्हा तरुणांच्या मनामध्ये होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला. शेवटी चव्हाण साहेबांच्या विचार आणि नेतृत्वाने, जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली. ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं, तो दिवस होता १ मे १९६०. आम्ही सगळे तरुण, विद्यार्थी या सगळ्या प्रश्नांसंबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीने त्या चळवळीमध्ये सहभागी झालो होतो. ते जाहीर करण्यापूर्वी ज्यांच्या कर्तृत्वाने हे महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते यशवंतराव चव्हाण १ मे ला सकाळी ९ वाजता शिवनेरीवर येणार होते. शिवनेरीवर ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृतपणे जाहीर करतील. ही बातमी आम्हाला समजली त्यामुळे आम्ही पाच-सहा मुलांनी निर्णय घेतला शिवनेरीवर जायचं. पुण्यातून कॉलेजच्या रस्त्यावरून रात्री २:०० वाजता आम्ही निघालो आणि शिवनेरीला आलो. आयुष्यातला पहिला हा माझा जुन्नर तालुक्याचा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोर पुरुष, महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हा लोकांना मिळाली. ही गोष्ट कधी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही.
भाग्य एकच आहे की नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जनतेने तीन-चार वेळा दिली, मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आलो, तेव्हा माझं वय होतं २७, साल होतं १९६७. त्यानंतरच्या दिवसापासून आजपर्यंत १४ वेळा निवडणुका जिंकल्या आणि सतत कधी विधानसभा, कधी विधान परिषद, कधी लोकसभा, कधी राज्यसभा या सगळ्या संस्थांमध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडण्याची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते. इथे आल्यानंतर निवृत्तीशेठ शेरकर यांची आठवण झाली, श्रीकृष्ण तांबे त्यांचीही भेट झाली, रामचंद्र पाटील औटी, श्री. गुंजाळ, ठाण्याला राजाशिव एक आमदार होते, पण ते होते जुन्नरचे ते आमच्याबरोबर होते, श्री. काकडे होते, लताबाई तांबे होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे विलासदादा कांबळे हे आम्हा लोकांबरोबर काम करत होते. या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. जे हयात नाहीत त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी केला. जे हयात आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. एक नाव विसरलो कृष्णराव मुंढे या तालुक्याने आदिवासी समाजातला आमदार हा मोठ्या मतांनी करून दिला आणि तेही आम्हा लोकांच्या काळामध्ये आले आणि म्हणून जुन्नर ला आल्यानंतर जुन्या आठवणी येतात, जुने कार्यक्रम आठवतात आणि अनेक गोष्टी आठवतात.
मला आठवतंय, धरणाच्या पूजेसाठी यशवंतराव चव्हाण आले, आम्ही त्यांच्याबरोबर आलो. पूजेच्यासाठी यशवंतरावजी बसले त्यांच्या हातात ताट होतं. शेतकऱ्यांची जमीन त्या धरणासाठी घेतली होती, त्याच्या नुकसान भरपाईचं काम राहिलं होतं. एक माऊली उठली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकावून घेतलं. जुन्या लोकांना माहीत असेल. तो कार्यक्रम त्या ठिकाणी संकटात गेला, पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेवटी ते पूजन झालं. आज जुन्नर तालुक्याकडे नजर टाकली तर त्या जुन्नरचा चेहरा बदलला आहे. इथे उत्तम शेती करतात, उसाची लागवड करतात, केळी करतात. मुंबईच्या बाजारातच नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जुन्नरचा शेतकरी देशाची गरज भागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणात करत आहे, हा या जिल्ह्याचा चेहरा आहे. मला आनंद आहे, किती काही धरणं झाली त्याच्या निम्म्यापेक्षा धरणाचे भूमिपूजन हे माझ्या हातून झालेले आहे. जी काही धरणं झाली त्यातील बहुसंख्य धरणांचा निर्णय माझ्या सहीने झालेला होता. त्यामुळे जुन्नरचा चेहरा बदलला.
एक काळ असा होता, की मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट, भायखळा मार्केट आमचे जुन्नरचे सहकारी त्या ठिकाणी अनेक असायचे. माझ्या घरी शेतीमध्ये आमची द्राक्षाची बाग होती, मोसंबीची बाग होती आणि भाजीपाला असायचा. कधीतरी एखाद्या शनिवारी सुट्टी असली, तर आई सांगायची की हा माल मुंबईला घेऊन जा आणि नाव विसरलो मी त्यांच्याकडे हे माल नेऊन द्या. टेम्पोमधून जावं लागायचं. तिथे गेल्यानंतर माल तिथे द्यायचा क्रॉफर्ड मार्केटला. आणि आनंद कशाचा होता, जो कोणी दलाल असेल त्यांच्याकडे माल द्यायचा. त्या मालाची विक्री झाल्यानंतर मुंबईच्या कुठल्यातरी थिएटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायचे. एक कप चहा आणि सिनेमा आम्ही लोक खुश होऊन जायचो, त्या जुन्नरी लोकांच्या पाहुणचाराने. आज ते आहे पण प्रमाण कमी आहे आणि जे चांगलं काम करतात, त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो.
माझ्या वाचनात आलं, पानसरे यांना अटक केली, कधी चुकीचं काम केलं त्यांनी? मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची विक्री जास्तीत जास्त करण्याला कोणते गृहस्थ आहेत, हे जर विचारलं तर पानसरे यांचे नाव लोक घेतात. नुसती महाराष्ट्रातील फळं नाही, महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा. इथली फळं भारताच्या बाहेर पाठवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्यांचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे पानसरे करतात. केवळ त्यांची विचारधारा आम्हा लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवायचा निकाल आजच्या राज्यकर्त्यांनी केला. हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी द्यायचा असतो, पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी लोकांवर खटले भरले.
काल प्रधानमंत्री कराडला सांगताहेत की ही ED वगैरे जी आहे त्याचा १ टक्का सुद्धा आम्ही वापर करत नाही आणि १ टक्का सुद्धा करत नसाल, तर कोणाच्या विरुद्ध करता हे महत्त्वाचं आहे. हे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल तर १ टक्का असो किंवा आणखी काही असो याचा अर्थ हा आहे की तुम्ही हुकूमशाहीच्या रस्त्यावर जायला लागले आहेत. त्यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो, हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं. काल त्यांनी सांगितलं, की महाराष्ट्रामध्ये एक आंतरआत्मा आहे, तो आत्मा अस्वस्थ आहे. तो गेल्या ४५ वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतोय, सरकार अडचणीत आणतोय. आणि या आत्म्यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे. ते म्हणले, त्यांचं भाषण मी वाचलं, टी.व्ही.वर घरी जाऊन ते बघितलं, की आत्मा अस्वस्थ आहे, खरंय, तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मांडायचं असेल तर त्यासाठी काय करावं या विचाराने हा आत्मा अस्वस्थ आहे. आज सबंध देशामध्ये सामान्य लोक महागाईने अडचणीत आली, आणि लोकांना संसार प्रपंच करणं अवघड झालं आहे, त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली, तर १०० वेळा ही अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कारण अडचणीतल्या माणसाचं दुखणं हे मांडणं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम केलं पाहिजे, हे संस्कार माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांनी केलेत, आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार नाही.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी शहजादे म्हणून त्यांचा उल्लेख केला की शहजादे क्या करेंगे? कैसा करेंगे? प्रधानमंत्री यांना काहीतरी वाटलं पाहिजे त्यांच्या तीन पिढ्यांनी देशाची सेवा केली. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी १३ वर्षे तुरुंगात होते. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचे राज्य येण्याची खबरदारी घेतली. विविध क्षेत्रांमध्ये देश पुढे जाईल यासाठी पाऊलं त्यांनी टाकली. या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरीबी घालवण्यासाठी आणि देशातील गरीब माणसासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली, त्यांची हत्या झाली, संसार उध्वस्त होईल अशी स्थिती झाली. त्यांच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे न्यावा यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली. एक दिवशी दक्षिणेत गेल्यानंतर बॉम्बस्फोट मध्ये त्यांच्या शरिराच्या चिंधड्या केल्या, ते मारले गेले. इतका अत्याचार केला वडील, आजोबा, आई, आजी या सगळ्यांनी देशासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींना हे विचारतात शहजादा क्या करेंगे आप? या शाहजाद्याने देशाचे दुखणे समजण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पायी सबंध देशाचा दौरा केला, ऊन व पाऊस काही बघितलं नाही. जाताना रस्त्याने शेतकऱ्यांना भेट, तरुणांना भेट, आया-बहिणींना भेट, त्यांचं दुखणं समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत, याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला. त्याचे कौतुक करणे सोडा तर त्याला शहजादा म्हणून त्याची टिंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात. प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं, ते देशाचं पद असतं, त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते, ती प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण तयार आहोत. पण त्या पदावर बसलेली व्यक्ती खोट्या गोष्टी सांगत असेल, चुकीच्या गोष्टी मांडत असेल, चुकीच्या टिका-टिप्पणी करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता वापरायची असते याचा त्यांना विसर पडत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला आणि मला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल तर उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी काही तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्हेंचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, तिथलं बटन दाबणं, त्यांना मोठ्या मतांनी विजयी करणं आणि महाराष्ट्रातील सगळी शक्ती एकत्रित करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे, हा निकाल आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही लोक देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहोत. मोदी साहेब म्हणतात, माझ्याबद्दल हा आत्मा तडफडत फिरत आहे. ठीक आहे, लोकांचे दुःख बघून तडफडतो त्याची मला काही चिंता नाही. ही खात्री देऊ शकतो की काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण आम्ही कधी लाचार बनणार नाही, महाराष्ट्र कधी लाचार बनू शकत नाही, महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही. एवढं फोडाफोडीचं राजकारण केलं, घरातली माणसं फोडली, सहकारी फोडले. अनेकांना अनेक वर्षे काम करण्याची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोडलं आणि एक वेगळं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज भाजपावाले करत आहेत हे राज्याच्या हिताचे नाही. जे हिताचं नाही त्यांना खड्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. तेच काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121




Post a Comment
0 Comments