सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
धुमळवाडी येथे रानभाजी ओळख व संवर्धन कार्यशाळा संपन्न.
फळांचे गाव धुमाळवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी ‘रानभाजी ओळख व संवर्धन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रानभाज्यांचे आहारातील महत्व सर्वसामान्यांना पटवून देणे आणि त्यांच्या संवर्धनात सहभाग वाढविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे-१६ (स्वायत्त), महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ नागपूर, तालुका कृषी विभाग फलटण आणि धुमाळवाडी मधील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाजीवर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांनी रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच पाककृतींची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रदर्शनात २० हून अधिक रानभाज्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण खलिद मोमीन, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, पुणे डॉ. प्राची क्षीरसागर, विभागीय सल्लागार, महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे विभाग विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा शोभा कुलकर्णी, जिल्हा प्रकल्प सल्लागार, महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अभिजीत काटकर , मंडळ कृषी अधिकारी, विडणी शहाजी शिंदे , उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर , कृषी सेवा रत्न सचिन जाधव,ग्रामसेविका मोनीका सावंत, मुख्याध्यपिका स्मिता अडसूळ तसेच वनविभागातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व अधोरेखित केले, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, पुणे डॉ. प्राची क्षीरसागर यांनी रानभाज्यांच्या संवर्धनाची गरज आणि लागवडीचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन कृषी सेवा रत्न, सहाय्यक कृषी अधिकारी, सासकल. सचिन जाधव यांनी केले. गावातील उपक्रमशील शेतकऱ्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता *“रानभाजी खाऊ… निरोगी राहू”* या घोषवाक्याने करण्यात आली.

Post a Comment
0 Comments