सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन २K२५’चा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..
८ राज्यांतील विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रकल्पांचा गौरव!
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन २K२५’ प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रासह ८ राज्यांतील सुमारे ३ हजार नवसंकल्पक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, ज्यामुळे फलटणच्या शैक्षणिक प्रगतीची मोहोर राष्ट्रीय स्तरावर उमटली.
*मान्यवरांचे मार्गदर्शन आणि नवोपक्रमाचे महत्त्व*
या कार्यक्रमासाठी एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पुणेच्या कुलगुरू मा. डॉ. सुषमा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात नवोपक्रम (Innovation) आणि संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक आणि तांत्रिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करून कल्पनांना वास्तवात उतरवण्याचे आवाहन केले. स्पर्धेत सादर झालेले कृषी, ऊर्जा आणि स्मार्ट सिटीवर आधारित प्रकल्प देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*विविध क्षेत्रांतील अभिनव प्रकल्पांची मोहोर*
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांचा संगम दिसून आला.
पदवी (डिग्री) स्तरावर सायबर सुरक्षा आणि आरोग्य सेवेवर आधारित प्रकल्पांनी बाजी मारली. ‘व्हीआर सायबरक्राईम सीन इन्वेस्टिगेशन लॅब’ (जी.एच. रायसोनी कॉलेज, पुणे) हा सायबर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करणारा प्रकल्प विजेता ठरला. तर ‘एपिकेअर’ (अजिंक्या डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग) ही स्मार्ट आरोग्य सेवा व्यवस्थापन प्रणाली दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली, जी रुग्ण-डॉक्टर संवाद सुधारून रिअल-टाइम आरोग्य सेवा सुलभ करते. या स्तरावर ‘स्मार्ट गॅस ट्रॉली’ आणि ‘स्मार्ट कीटकनाशक स्प्रेयर’ यांसारख्या उपयुक्त प्रकल्पांना उपविजेते (रनर) म्हणून गौरविण्यात आले.
डिप्लोमा स्तरावर सामाजिक आणि व्यवस्थापनावर आधारित प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरले. ‘स्मार्ट असाइन सिस्टम’ (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस) आणि आरोग्य ट्रॅकिंगसाठीचा ‘कॅलरिफी’ (राजाराम शिंदे इन्स्टिट्यूट) हे प्रकल्प विजेते ठरले. उपविजेत्यांमध्ये (रनर) ‘स्मार्ट हँड ग्लोव्ह्स फॉर साइन इंटरप्रिटेशन’ (झील पॉलिटेक्निक, पुणे) हा प्रकल्प बहिरे-मुके व्यक्तींच्या संकेत भाषेचे भाषांतर करून समावेशक समाज निर्मितीला चालना देणारा ठरला. तसेच, ‘स्वयं-चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेहिकल’ (एस.व्ही.पी.एम. इन्स्टिट्यूट, माळेगाव) हा पर्यावरणपूरक वाहतूकीची संकल्पना साकारत होता.
*उद्योग क्षेत्रातील सहकार्य आणि समारोप*
या राष्ट्रीय स्पर्धेला कमिन्स इंडिया, गोविंद मिल्क, ॲसेंट सॉफ्टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या नामांकित संस्थांनी मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य केले. यामुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दृढ सहकार्य दिसून आले. यावेळी श्री. भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरीष भोसले, शिरीष दोशी तसेच प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोजकुमार दळवी उपस्थित होते.
युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी ‘इनोव्हेशन २K२५’ मुळे देशभरातील नवोन्मेषी कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे नमूद केले. हा सोहळा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व प्रायोजक आणि प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
प्रचार डॉ. मनोजकुमार दळवी यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रा. अमरसिंह रणवरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. प्रा. रूजल दोशी यांनी सुत्रसंचलन केले.

Post a Comment
0 Comments