सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण वैभव जगताप
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला तरुण होतकरू योद्धा : युवराज पवार
वृत्तपत्र क्षेत्रासह सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या १५/२० वर्षापासून आघाडीवर राहुन काम करणारे तरुण, होतकरु, अभ्यासू आणि सतत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असलेले युवराज महादेव पवार यांचा आज शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी ४० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा....*
युवा जनमत या साप्ताहिकाचे संपादक आणि दैनिक मुक्तागिरीचे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले युवराज पवार हे फलटण तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सहकार, वृत्तपत्र वगैरे विविध क्षेत्रात काम करताना सातत्याने सर्वसामान्यांना आपल्या कामातून कसा फायदा होईल किंवा त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते.
महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सव असेल दुर्गा माता उत्सव असेल किंवा दीपावली सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या किल्ले स्पर्धा असतील त्यामध्ये आपल्या भागातील किंबहुना शहरातील तरुणांना सहभागी होता आले पाहिजे, या सार्वजनिक उत्सवात सहभागी होताना त्यांना कोणत्याही प्रकारे चुकीच्या मार्गाने जाऊ न देता, गणेशोत्सव, दुर्गा माता उत्सव यामध्ये तरुणांना कोणत्या प्रकारचा अभ्यास करता येईल त्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत होतील आणि त्यांचे भावी आयुष्य निश्चितपणाने योग्य दिशेने नेता येईल याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल या दृष्टीने विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात ते सतत प्रयत्नशील असतात.
महाराजा प्रतिष्ठानची स्थापना सन २००७ मध्ये झाल्यापासून युवराज पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सातत्याने समाजातील गरजूंना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल याचा विचार केला आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांसाठी संगणक शिक्षणाची सुविधा किंवा महिलांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा विचार केला त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शिबिरे आयोजित करून त्या माध्यमातून मग वैद्यकीय तपासणी असेल नेत्र तपासणी असेल किंवा या शिबिराच्या माध्यमातून महिलांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी असेल या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने समाजातील गरजूंना मदत करणारे केंद्र म्हणून महाराजा प्रतिष्ठानचा उपयोग करण्यात आल्याने निश्चितपणाने युवराज पवार हे समाजातील गरजूंसाठी मार्गदर्शक केंद्र बनल्याचे त्या काळात अनेकांनी पाहिले अनुभवले आणि त्यांना धन्यवाद ही दिल्याचे माझ्या पाहण्यात ऐकण्यात आहे.
स्वतःचा व्यवसाय म्हणून सुरू केलेले सरकार सेवा केंद्र हे तर व्यवसायापेक्षा शहरातून आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे शेतकरी असतील, कामगार असतील, स्त्रिया किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी असतील त्यांना आवश्यक असलेले विविध प्रकारचे दाखले, ७/१२ आणि ८ अ सह अन्य प्रकारचे जमिनीचे उतारे, घराचे उतारे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना आवश्यक असलेले मार्गदर्शन, बँक अकाउंट ला जोडलेला मोबाईल नंबर किंवा त्यांच्या मोबाईल नंबर ला जोडलेले बँक अकाउंट याविषयी त्यांना सविस्तर माहिती देऊन योग्य पद्धतीने त्यांना पैसे हातात कसे येतील यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन अगदी एखाद्या विद्यार्थी/विद्यार्थिनीला शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक असलेला दाखला उपलब्ध होण्यात अडचणी असतील वेळ लागत असेल तर स्वतः महसूल चावडी किंवा तहसील कार्यालयात जाऊन त्यांना मदत करण्यासाठी आघाडीवर असलेले हेच एकमेव सरकार सेवा केंद्र असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले आहे.
याच सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल त्यासाठी प्रसंगी अगदी मंत्रालय पातळीवर संपर्क करून त्याची अडचण त्या संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याला पटवून देऊन प्राधान्याने निधीची रक्कम रुग्णालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी धडपडणारा हा तरुण प्रसंगी केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणाऱ्या मदती त रुग्णाचा खर्च भागणारा नसेल तर त्याला अन्य कोणत्या मार्गाने पैसा उपलब्ध होईल यासाठी मार्गदर्शन करण्यात किंबहुना त्या सेवाभावी संस्थांचे अर्ज भरून देऊन प्रत्यक्ष त्यांना पाठविण्यापर्यंत युवराज पवार प्रयत्नशील असल्याचे आपण अनेकदा पाहिले अनुभवले आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात काम करताना त्यांचे स्वतःचे युवा जनमत हे साप्ताहिक असेल, किंवा ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या दैनिक मुक्तागिरी असेल अगदी अन्य वृत्तपत्राच्या माध्यमातूनही समाजातील दुखणे प्राधान्याने शासन प्रशासन लोकप्रतिनिधी समोर मांडण्यासाठी युवराज पवार सातत्याने प्रयत्नशील असतात त्यामध्ये मग शहरातील पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा अतिवृष्टी आणि अवर्षणामुळे झालेल्या नुकसानीतून संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रसंगी त्याच्या बांधापर्यंत जाऊन माहिती फोटो घेऊन त्याला विस्तृत प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धी द्वारे त्याला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न असतील किंवा एखाद्या गरीब गरजू रुग्णाला शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक वैद्यकीय मदत किंवा वैद्यकीय उपचार तातडीने झाले पाहिजे आणि रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रसंगी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील असलेले युवराज पवार निश्चितपणे अनेकांना देवदूत वाटले असतील तर त्यात वावगे काहीच नाही.
एखाद्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर किंवा शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळण्यात अडचणी येत असतील तर त्यासाठी त्या कार्यालयात अगदी कार्यालय प्रमुखापर्यंत जाऊन सदरच्या लाभार्थ्याचे दुखणे त्यांच्यासमोर मांडून असलेल्या तांत्रिक बाबी योग्य पद्धतीने दूर करून त्याला लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असताना मग त्यामध्ये शासनाच्या योजनेतून वृद्ध नागरिकांना किंवा विधवा परित्यक्ता महिलांना, अपंगांना मिळणारा लाभ असेल त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी योग्य पद्धतीने दूर करून त्याला कायदेशीर मार्गाने लाभ कसा होईल यासाठीही युवराज पवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आपण पाहिले आहे.
फलटण शहरातील वाढती लोकवस्ती आणि वाढता व्यापार यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडत असताना त्यावरुन होणारी वाहतूक निश्चितपणाने शहरातून शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी असतील बाजारपेठेतून जाणारे नागरिक असतील किंवा ग्रामीण भागातून शहरात आलेले वृद्ध नागरिक असतील यांच्यासाठी धोकादायक बनत चालली असताना युवराज पवार यांनी ही अडचण लक्षात घेऊन शासन प्रशासन प्रामुख्याने पोलीस यंत्रणेला शहराबाहेरून वाहतूक सुरू करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या रिंग रोडचा वापर करण्याची मागणी निवेदनाद्वारे आणि समक्ष भेटून अनेक वेळा केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवराज पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरची वाहतूक शहरातून बंद करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर अगदी एसटी बसेस आणि जड वाहनांसह संपूर्ण वाहतूक शहराबाहेरून रिंग रोड द्वारे करण्यात आल्याने शहरातील व्यापारी वृद्ध नागरिक महिला आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी युवराज पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले होते.

Post a Comment
0 Comments