सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मुधोजी महाविद्यालयात 'जीएसटी प्रॅक्टिसेस' कोर्सची सुवर्णसंधी; ११ जानेवारीपासून कोर्स सुरू.
फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कौशल्याचे द्वार खुले: वाणिज्य विभागाचा स्तुत्य उपक्रम.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी असून चालत नाही, तर त्यासोबत व्यावहारिक कौशल्ये असणे काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अशा प्रकारच्या कोर्सची गरज असल्याचे ओळखून मुधोजी महाविद्यालया च्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 'सर्टिफिकेट कोर्स ऑन जीएसटी प्रॅक्टिसेस' (Certificate Course on GST Practices) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा कोर्स रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होत असून, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
देशात जीएसटी (GST) करप्रणाली लागू झाल्यापासून प्रत्येक लहान-मोठ्या व्यवसायात 'अकाऊंटंट' आणि 'टॅक्स प्रॅक्टिशनर'ची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान असूनही प्रत्यक्ष जीएसटी पोर्टलवर काम करण्याचे प्रॅक्टिकल ज्ञान नसते. ही तफावत दूर करण्यासाठी मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने पुढाकार घेतला आहे.
या कोर्समध्ये तज्ज्ञ चार्टर्ड अकाऊंटंट (CA) आणि टॅक्स कन्सल्टंट यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. यात जीएसटी नोंदणी, रिटर्न भरणे, ई-वे बिल जनरेशन आणि टॅली (Tally) मधील जीएसटी एन्ट्रीज यांचे सखोल आणि प्रात्यक्षिक ज्ञान (Practical Training) दिले जाईल.
या उपक्रमाबाबत बोलताना मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. कदम म्हणाले की, "पुण्या-मुंबईसारख्या शहरात हजारों रुपये फी भरून जे शिक्षण मिळते, तेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण आम्ही नाममात्र दरात आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून देत आहोत. या कोर्समुळे विद्यार्थी 'Job Ready' होणार आहेत."
फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, विशेषतः कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम केले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी त्वरित मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाशी संपर्क साधावा.

Post a Comment
0 Comments