सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने अधिकारी व मान्यवरांचा पाहणी दौरा -गिरीश बनकर (सातारा जि.प. सदस्य)
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा मा. प्रियाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मुक्काम स्थळांची पाहणी, वारकऱ्यांच्या सुविधेत हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही
सातारा / लोणंद - जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. प्रियाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पालखी मुक्काम स्थळांची पाहणी करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पालखीचे पहिले स्वागत स्थळ असलेल्या श्री क्षेत्र नीरा दत्तघाट येथे भेट देण्यात आली. या ठिकाणी माऊलींचे पवित्र स्नान होते आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे सहर्ष स्वागत केले जाते. त्या पूर्वसंध्येला सर्व व्यवस्था काटेकोरपणे ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंडपाच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर लोणंद पालखी तळाची पाहणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
वारीतील पहिले ऐतिहासिक उभे रिंगण ज्या ठिकाणी पार पडते ते पवित्र स्थळ म्हणजे चांदोबाचा लिंब या ठिकाणची देखील पाहणी अधिकाऱ्यांनी केली. रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असणारी मैदानाची सपाटीकरण, बॅरिकेड्स, पाणी आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली.
यानंतर तरडगाव पालखी तळावर जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर यांच्या वतीने मान्यवरांचे वारकरी उपरणं आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी चालू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करताना कामाच्या दर्जाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन मॅडम आणि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे मॅडम यांच्याकडे वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या सुख-सुविधांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये आणि कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी समाज कल्याण सभापती ऋषी आप्पा धायगुडे, कृषी सभापती लताताई कर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे साहेब, तरडगाव जिल्हा परिषद गटाचे कार्यक्षम सदस्य गिरीश बनकर,पंचायत समिती तरडगाव गटाचे सदस्य राहुल नरुटे व सौ. निलम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असून लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाकडून यंदा अधिक चोख नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments