Type Here to Get Search Results !

तरडगावच्या चांदोबा लिंब येथे पहिले उभे रिंगण अलोट उत्साहात संपन्न..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

तरडगावच्या चांदोबा लिंब येथे पहिले उभे रिंगण अलोट उत्साहात संपन्न..!




अश्वांच्या दौडीने वारकऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फेडले.

तरडगाव, ता. फलटण (सातारा): आषाढी वारीचा आत्मा असलेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे उभे रिंगण आज तरडगाव येथील ऐतिहासिक चांदोबा लिंब येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडले.


'माऊली, माऊली' च्या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात आसमंत दणाणून गेला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवांच्या मेळ्यात अथांग माऊलींच्या जयघोषात हे पहिले उभे रिंगण सोहळा साजरा करण्यात आला.


लोणंद येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळ्याने फलटणच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सरहद ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर सोहळा चांदोबा लिंब येथे पोहोचला.


या ठिकाणी आधीच नगारा, मानाचे अश्व आणि दिंड्या दाखल झाल्या होत्या. माऊलींच्या रथापुढील २७ व १२५ क्रमांकाच्या दिंड्यांमध्ये चोपदारांनी काठीच्या इशाऱ्यावर गोलाकार उभे रिंगण आखले.


सर्वांचे लक्ष लागलेल्या माऊलींच्या दोन अश्वांनी वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करत नेत्रदीपक दौड घेतली. अश्वांनी रथाला प्रदक्षिणा घालून पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी अश्वांना बुक्का लावून, हार घालून डाळ-गुळाचा नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा जोरात धाव घेत दोन्ही अश्वांनी उभे रिंगण पूर्ण केले.


रिंगण पूर्ण होताच वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला. अश्वांच्या टापाखालची माती ललाटी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ आणि शेतातून वाटेवर उभे असलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा सोहळा पार पडल्यानंतर पालखी सोहळा तरडगाव येथील मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. उद्या पहाटे महापूजा झाल्यानंतर पालखी फलटणकडे प्रस्थान करेल.

Post a Comment

0 Comments