सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
निरा नदीला पूर - श्री दत्तघाट पाण्याखाली; दत्त मंदिरांमध्ये पाणी, भाविकांमध्ये चिंता.
निरा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे फलटण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र दत्तघाट, निरा येथील संपूर्ण घाट परिसर पाण्याखाली गेला आहे.
दत्त मंदिराचा घाट, मंदिराकडे जाणारा पूल आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे. मंदिराच्या कळसाचा काही भाग आणि प्रवेशद्वारापर्यंत पाणी पोहोचले असून, घाटावरील झाडे अर्धी पाण्यात बुडाली आहेत. मागे दिसणारा निरा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल आणि नवीन पुलाखालूनही प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुराचे कारण -
गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाटघर, नीरा-देवधर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात करण्यात येत असल्याने नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याच फटका दत्तघाटाला बसला आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर -
पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने दत्तघाट परिसरात कोणालाही जाऊ नये, अशी सूचना दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून, भाविकांनी सध्या दर्शनासाठी येणे टाळावे, असे आवाहन मंदिर समिती व पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments