सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
होळ येथील निरा नदीवरील पूल पाण्याखाली; होळ-बारामती वाहतूक बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. फोटोत दिसत आहे त्याप्रमाणे पुलाच्या दोन्ही टोकांवर पोलिसांचे बॅरिकेड्स लावण्यात आले असून, नागरिकांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
होळ - बारामती संपर्क तुटला
होळ - बारामती हा या भागातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. हा पूल बंद झाल्याने फलटण ते बारामती दरम्यानचा थेट संपर्क तुटला आहे. याचा फटका शाळा, कॉलेज, दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर
पाणी पातळी अजूनही वाढत असल्याने फलटण ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही पुल ओलांडण्याचा किंवा पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
"निरा नदीवरील होळ पुलावरून पाणी जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही दोन्ही बाजूने बॅरिकेड लावून वाहतूक बंद केली आहे. पाणी ओसरेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सहकार्य करावे." - फलटण ग्रामीण पोलीस
पर्यायी मार्ग:
होळ - बारामतीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी सध्या फलटण - लोणंद - नीरा - बारामती या मार्गाचा वापर करावा.
नदीच्या पाणी पातळीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असून, पाणी ओसरल्यानंतर आणि पुलाची पाहणी केल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात येईल.
नागरिकांना आवाहन: अफवांवर विश्वास ठेवू नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा.

Post a Comment
0 Comments