सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
माऊलींच्या पालखीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; साखरवाडी मुस्लिम जमातीतर्फे माऊलींच्या पालखी सोहळ्यात चहा-बिस्किटांचे वाटप.
साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे साखरवाडीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे मनोहारी दर्शन घडले. येथील मुस्लिम जमात बांधवांच्या वतीने सर्व वारकरी माऊलींसाठी चहापान व बिस्किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी पहाटे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साखरवाडी नजीकच्या बडेखान परिसरातून मार्गस्थ होत होता. या वेळी वारीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी साखरवाडी येथील मुस्लिम जमातीने हा उपक्रम आयोजित केला होता.
पहाटे पाच वाजल्यापासूनच मुस्लिम बांधवांनी स्टॉल लावून वारकऱ्यांची सेवा सुरू केली. सुमारे अडीच हजार वारकरी माऊलींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी वारकऱ्यांसाठी गरमागरम चहा, बिस्किटे यासोबतच शुद्ध पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली होती.
हा सामाजिक सलोख्याचा उपक्रम साखरवाडी येथील श्री. हरिदास सावंत सर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. यासाठी साखरवाडी व परिसरातील सर्व मुस्लिम जमात बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
पालखी सोहळ्यातील अनेक दिंडी प्रमुखांनी आणि वारकरी माऊलींनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. वारी म्हणजे केवळ भक्ती नाही तर माणुसकी आणि एकतेचा संगम आहे, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
याप्रसंगी हजरत श्री. सौद भाई शेख यांनी मुस्लिम जमातीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आम्हा सर्वांचीच आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. सर्व वारकरी बांधवांनी आमच्या सेवेचा स्वीकार केला याबद्दल आम्ही आभारी आहोत. यापुढील काळात हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आमचा मानस आहे."
या उपक्रमामुळे साखरवाडी परिसरात सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक एकतेचा एक आदर्श निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments