सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ ची ऑनलाइन नोंदणी सुरू; फलटणकरांना डॉ.प्रसाद जोशी यांचे सहभागाचे आवाहन.
फलटण : धकाधकीच्या जीवनात हरवलेले आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी फलटणकर सज्ज झाले आहेत. आरोग्य, आनंद आणि व्यायामाचा संदेश घराघरात पोहोचवणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ च्या दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य मॅरेथॉनची ऑनलाइन नोंदणी आज, १४ सप्टेंबर, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत असून, फलटणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यंदाच्या मॅरेथॉनची मध्यवर्ती संकल्पना ‘Run for Health & Happiness’ अशी असून, रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथून या आरोग्य चळवळीचा झेंडा फडकणार आहे.
यंदाचे सर्वात मोठे आकर्षण - देशात पहिल्यांदाच
या मॅरेथॉनचे सर्वात मोठे आणि हृदयस्पर्शी आकर्षण ठरणार आहे रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ कि.मी. ची विशेष वॉकथॉन. आयोजकांच्या मते, अशा प्रकारची वॉकथॉन देशात प्रथमच फलटणमध्ये होत असून, जागतिक अस्थिरोग दिनाचे औचित्य साधून यातून अवयवदानाचा मोठा संदेशही दिला जाणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि वयोगट
सर्व वयोगटातील नागरिकांसाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागाची संधी आहे.
• मुख्य शर्यती: २१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. • वयोगट: १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ ते ६४ असे चार गट • फन रन: १२ वर्षांवरील सर्वांसाठी ३ कि.मी. फन रन • ज्येष्ठांसाठी: ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी ३ कि.मी. वॉकथॉन
प्रत्येक मुख्य वयोगटात पुरुष आणि महिला असे स्वतंत्र गट असतील. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक - १०,००० रु., द्वितीय - ७,००० रु., तृतीय - ५,००० रु. असे एकूण ६० पारितोषिकांची लयलूट असणार आहे.
धावपटूंसाठी पर्वणी आणि नयनरम्य मार्ग
ही केवळ शर्यत नाही तर एक सोहळा असणार आहे. प्रत्येक धावपटूला आकर्षक टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि सरप्राईज गिफ्ट असलेले प्रीमियम मॅरेथॉन किट मिळणार आहे.
फलटणचा निसर्गरम्य परिसर या मॅरेथॉनची शोभा वाढवणार आहे. ऊसाच्या हिरव्यागार शेतांमधून आणि द्राक्षबागांच्या कुशीतून जाणारा मार्ग हा धावपटूंसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. संपूर्ण मार्गावर पाण्याची उत्तम सोय, धावण्यापूर्वी झुंबा वॉर्मअप आणि धावल्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
नोंदणी शुल्क आणि अंतिम तारीख • २१, १०, ५ कि.मी. साठी: पुरुष - ७५० रु. + कर, महिला - ५०० रु. + कर • ३ कि.मी. फन रन: ३०० रु. • ६५+ ज्येष्ठ नागरिक वॉकथॉन: पूर्णपणे मोफत
ऑनलाइन नोंदणी दि. १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
फलटणच्या आरोग्य चळवळीत आपला सहभाग नोंदवून हा दशकपूर्ती सोहळा ऐतिहासिक करूया, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments