Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवापूर्वी फलटण ग्रामीण पोलिसांचा दणका; ९३८४० हजारांचा देशी दारू साठा जप्त, महिला ताब्यात!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

गणेशोत्सवापूर्वी फलटण ग्रामीण पोलिसांचा दणका; ९३८४० हजारांचा देशी दारू साठा जप्त, महिला ताब्यात!



फलटण (दि. १४ सप्टेंबर): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत साखरवाडी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३/०९/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास साखरवाडी दूरक्षेत्राचे पथक निंभोरे ते फडतरवाडी रोडवर पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक महिला संशयास्पदरित्या मोटारसायकलवरून जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिला थांबवून पंचांसमक्ष तिच्या वाहनाची झडती घेतली.

तपासणी दरम्यान वाहनावर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण ४८ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची अंदाजे किंमत ३,८४० रुपये इतकी आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल, अंदाजे किंमत ९०,००० रुपये, असा एकूण ९३,८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी महिला वय ४८ वर्षे, रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी प्रभारी अधिकारी स.पो.नि. प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिसे, पोलीस हवालदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांच्या पथकाने केली आहे.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments