सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
साखरवाडी–पिंपळवाडी गणात राजकीय चर्चांना उधाण..!
अपात्र सदस्यांमुळे पंचायत समिती उमेदवारांचे भवितव्य टांगणीला..!
फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून साखरवाडी–पिंपळवाडी गणात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काही दिवसांपूर्वी साखरवाडी येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जाहीर सभेमुळे वातावरण तापले असतानाच, आता स्थानिक राजकारणात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींमुळे निवडणूक चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
साखरवाडी ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचा थेट परिणाम सध्या सुरू असलेल्या पंचायत समिती निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ डिसेंबर २०२२ रोजी विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणीनंतर संबंधित पाचही सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
तसेच, साखरवाडी गणातील पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून, अपात्र ठरविण्यात आलेल्या या पाच सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक मतदारांवर या सदस्यांचा प्रभाव असल्याने ते कोणत्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
निवडणूक जवळ येत असताना या घडामोडींमुळे साखरवाडी–पिंपळवाडी गणातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पंचायत समिती उमेदवारांचे भवितव्य या अपात्र सदस्यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.
पंचायत समिती उमेदवारांचे भवितव्य अपात्र सदस्यांच्या हाती....
साखरवाडी ग्रामपंचायतीतील सदस्यांविरोधात तक्रार सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चार महिला सदस्य व एक पुरुष सदस्य यांना दिनांक २९/११/२०२४ रोजी अपात्र ठरविण्याचा निकाल दिला. त्यामुळे हे सदस्य आगामी पंचायत समिती निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भावकीच्या राजकारणाचा फटका बसणार का?..
साखरवाडी, पिंपळवाडी व होळ या गावांमध्ये भावकीच्या राजकारणाचा प्रभाव कसा दिसून येणार, याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केले होती त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अपात्र करण्यात आले होते.गटातटाचे राजकारण अधिक तीव्र झाल्याने निवडणूक निकालातूनच या राजकारणाचा खरा परिणाम स्पष्ट होणार आहे.

Post a Comment
0 Comments