सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जिल्हा परिषद पुणे आयोजित महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उत्सव – मिनी सरस सावित्री जत्रा २०२६
दि. ७ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्हा परिषद आयोजित “मिनी सरस – सावित्री जत्रा २०२६” विक्री व प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण महिलांच्या कष्ट, जिद्द आणि स्वावलंबनाचा सन्मान करणारा हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
या प्रसंगी स्वयंसहाय्यता समूहांच्या आर्थिक बळकटीसाठी विविध बँकांच्या माध्यमातून तब्बल ४० कोटी रुपयांच्या कर्ज धनादेशांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण महिलांनी उभारलेल्या उद्योगांना आर्थिक पाठबळ देत त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला नवी गती मिळाली.
कार्यक्रमात विभागीय यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्कार वितरणासह पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण आणि महाआवास योजना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, संस्था व घटकांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकासाच्या दिशेने सातत्याने कार्य करणाऱ्या घटकांना हा सन्मान प्रेरणादायी ठरला.
यावेळी मेधा कुलकर्णी, शंकर मांडेकर, तसेच बापूसाहेब पठारे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच महिला स्वयंसहाय्यता समूह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रभाग संघांमार्फत कृषी ट्रॅक्टर खरेदी उपक्रमाला चालना देण्यात आली, तसेच पुणे जिल्हा परिषद यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ई-मोबाईल व्हॅन वाहनांच्या प्रतीकात्मक चाव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांनी तयार केलेली उत्पादने थेट शहरातील बाजारपेठेत पोहोचण्याचा नवा मार्ग खुला होत आहे.
“मिनी सरस – सावित्री जत्रा २०२६” अंतर्गत आयोजित विक्री व प्रदर्शन सिंचन नगर, एग्रीकल्चर कॉलेज परिसर, शिवाजीनगर, पुणे येथे ७ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीत पुणेकरांसाठी खुले आहे.
ग्रामीण महिलांच्या कष्टातून साकारलेली हस्तकला, घरगुती उद्योग, स्थानिक उत्पादने व पारंपरिक खाद्यपदार्थ अनुभवण्याची सुंदर संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे.
पुणेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत ग्रामीण महिलांच्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे आणि महिला सक्षमीकरणाच्या या प्रेरणादायी चळवळीला अधिक बळ मिळत आहे
ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना बाजारपेठ मिळाली, तर आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळते.

Post a Comment
0 Comments