Type Here to Get Search Results !

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवायांची मालिका सुरू.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवायांची मालिका सुरू.


कठोर प्रशासन, अचानक तपासण्या आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवायांची मालिका सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

तुकाराम मुंढे यांनी 26 मे रोजी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पहिली मोठी कारवाई पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे करण्यात आली. येथे रसायनांच्या मदतीने कृत्रिमरीत्या पिकवलेले तब्बल 800 किलो आंबे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या फळांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट आणि निकृष्ट दर्जाचा माल ताब्यात घेण्यात आला. त्याचवेळी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे 215 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुकाराम मुंढे हे त्यांच्या बेधडक आणि पारदर्शक कारभारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. प्रशासनातील शिस्त, नियमांचे कठोर पालन आणि जनहितासाठी घेतलेले निर्णय यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी विविध पदांवर काम करताना अनेक मोठे निर्णय घेतले असून अनेकदा राजकीय दबावालाही न जुमानता कारवाई केली आहे.

FDAमध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता अन्न भेसळ, बनावट औषधे, ऑनलाइन औषध विक्री आणि परवान्यांमधील गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश या कारवायांमधून दिसून येत आहे.



Post a Comment

0 Comments