सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : बेकायदेशीर स्फोटक साठा जप्त, 24 लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; दोघांवर गुन्हा, एकाला अटक.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन येथील बंद असलेल्या मराठी शाळेसमोरील मैदानात एका ट्रकमध्ये बेकायदेशीर स्फोटके साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक क्र. MH 11 CH 2555 ची झडती घेतली. या झडतीमध्ये सदर ट्रकमध्ये कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना आणि लोकवस्तीच्या ठिकाणी निष्काळजीपणे स्फोटके ठेवल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स असे एकूण 504 बॉक्स स्फोटकी पदार्थ आणि संबंधित ट्रक जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रु. 24,72,001/- इतकी आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 454/2026 अन्वये स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे :
1. शंकरलाल बेनीराम जाट, रा. बरड, ता. फलटण 2. हेमराज महावीर जाट, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, ता. फलटण
यातील आरोपी क्र. 2 हेमराज जाट याला पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत सुबनावळ हे करीत आहेत.
दरम्यान, लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर स्फोटके बाळगल्याने मोठा अनर्थ घडू शकला असता, पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment
0 Comments