सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
साताऱ्यात 64 लाखांचा अंमली पदार्थ जाळून नष्ट ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.
सातारा (दि. 19 जुलै 2026) - सातारा जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ नाश कमिटीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 509 किलो वजनाचा अंमली पदार्थ जाळून नष्ट केला आहे. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 64 लाख 13 हजार 147 रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ नाश कमिटी कार्यरत आहे. या कमिटीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष शिंदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. कृष्णकुमार जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांकडील एकूण 17 गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. या गुन्ह्यांचे इन्व्हेंटरी पंचनामे पूर्ण झालेले, सी.ए. प्रमाणपत्र प्राप्त झालेले आणि काही गुन्ह्यांचा निकाल लागलेला होता. त्यानुसार गांजा, गांजाची झाडे आणि अफूची झाडे असा एकूण 509 किलो मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय कमिटीने घेतला होता.
नियमानुसार ही नाश प्रक्रिया जैव कचरा निर्मूलन प्रकल्प, कराड हॉस्पिटल असोसिएशन, कराड येथील भट्टीमध्ये पार पाडण्यात आली. यावेळी न्याय सहाय्यक प्रयोगशाळा, गणेशखिंड, पुणे येथील सहायक रासायनिक विश्लेषक श्री. श.भा. गटकळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वैधमापन शास्त्र विभाग साताराचे निरीक्षक श्रीमती अर्चना जगदाळे, श्री. डी.व्ही. तेलंग, जैव प्रकल्प व्यवस्थापक श्री. राहुल पवार आणि दोन शासकीय पंच उपस्थित होते.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तथा अध्यक्ष अंमली पदार्थ नाश कमिटी श्री. निखील पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली, श्री. शिरीष शिंदे, श्री. कृष्णकुमार जाधव, श्री. विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, इरफान मुलाणी यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments