सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
तरडगावात दशकपूर्ती साजरी करीत 'निर्मल वारी'चा स्वच्छतेचा जागर; १८०० शौचालय, ११५ स्वयंसेवकांच्या सेवेतून साकारला 'स्वच्छ वारी'चा आदर्श.
तरडगाव, ता. फलटण - गेल्या दहा वर्षांपासून तरडगाव परिसर स्वच्छ, सुंदर आणि उघड्यावर शौचमुक्त राहावा, या एकाच ध्येयाने सुरू असलेला 'निर्मल वारी' उपक्रम यंदाही अखंडपणे आणि यशस्वीपणे पार पडला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी तरडगाव येथे मुक्कामासाठी येत असतात. या भक्तिसागरात केवळ भक्तीच नाही तर स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून साकारत 'निर्मल वारी'ने यंदाही उल्लेखनीय कार्य केले आहे.
२०१६ पासून सातत्याने 'निर्मल वारी'च्या माध्यमातून स्वच्छता सेवेचा वसा जपला जात आहे. पालखी सोहळ्यादरम्यान तरडगावात उघड्यावर शौचमुक्त परिसर राखण्यासाठी व्यापक जनजागृती आणि व्यवस्थापन केले जाते. यंदाचे वर्ष हे या उपक्रमाचे दशकपूर्तीचे वर्ष ठरले आहे.
यंदाच्या वर्षी शासनाच्या सहकार्याने तरडगाव परिसरात २१ ठिकाणी तब्बल १,८०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आली होती. या संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन, देखभाल आणि अंमलबजावणी 'निर्मल वारी'च्या स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली. या उपक्रमाची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती निर्मल वारी तरडगावचे प्रमुख अवधूत धुमाळ यांनी दिली.
पालखी मुक्कामाच्या काळात गाव आणि परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी ११५ स्वयंसेवकांनी निःस्वार्थ सेवाभावाने दिवस-रात्र सहभाग घेतला. या स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी थांबून वारकऱ्यांना शौचालयांचा वापर करण्याचे नम्र आवाहन केले. विशेष म्हणजे सर्व वारकरी भाविकांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता राखण्यात मोलाचे सहकार्य केले.
"प्रत्येक वारकऱ्यामध्ये आम्हाला माऊलीचेच दर्शन घडले. सेवा करताना भक्ती, समर्पण आणि समाधानाचा अनोखा अनुभव मिळाला," अशी भावना निर्मल वारीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
ही निर्मल वारी यशस्वी करण्यासाठी अवधूत धुमाळ, प्रदीप मदने, राहुल मोरे, शंभू मदने, अनिकेत माने आणि संग्राम चव्हाण या युवकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक सेवेमुळे आणि नियोजनामुळे तरडगाव पालखी मुक्कामात 'स्वच्छ वारी – निर्मल वारी' हा संदेश प्रभावीपणे रुजला असून, अध्यात्मासोबत सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments