सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
खंडाळा हद्दीत बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्यावर खंडाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
खंडाळा, ता. २५ जुलै २०२६ सातारा जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांवर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत खंडाळा पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. मौजे खंडाळा, ता. खंडाळा गावचे हद्दीत बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप यांना दिनांक २४.०७.२०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुना टोल नाका, खंडाळा येथे मदिरा बिअर शॉपी जवळ एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये एक इसम गांजा स्वतः जवळ बाळगून बसलेला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जगताप यांनी तात्काळ पोलीस स्टेशन कडील अंमलदार, शासकीय पंच आणि फोटोग्राफर यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी धाव घेतली. टोल नाक्याजवळील नवीन पुलाखाली उभी असलेली संशयित अल्ट्रोज कार ताब्यात घेऊन त्यातील इसमाला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन अनिल इंद्रेकर, वय ४४ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, रा. कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे असे सांगितले.
त्याला गाडीतून खाली उतरवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात -
१. हिरव्या काळ्या रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा - एकूण वजन ८० ग्रॅम
२. रोख रक्कम रु. २,६३,१००/-
३. रु. ५,००,०००/- किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची अल्ट्रोज चारचाकी गाडी
असा एकूण ७,६३,१०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी जागीच पंचनामा करून आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३६/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS) १९८५ चे कलम ८(c), २०(b),(ii)(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आरोपीला आज रोजी मा. हुजूर न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक २८.०७.२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
सातारा जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक साो. सातारा, श्रीम. वैशाली कडूकर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. सातारा, श्री. धन्यकुमार गोडसे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. फलटण भाग फलटण यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत सहभागी पथक
पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप, पोहवा शरद तांबे (३९३), पोहवा दत्ता दिघे (२६३), पोको अमित चव्हाण (९६८), पोको धिरज नेवसे (८१४), पोको हनुमंत गिते (१७४५), पोको श्रीकांत भोसले (८१५) यांनी या कारवाईत भाग घेऊन आरोपीस ताब्यात घेतले.

Post a Comment
0 Comments