सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण नगरपरिषदेतील कर रकमेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल; तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा ठपका.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन - पावती न मिळाल्यास त्वरित तक्रार करा
फलटण : फलटण नगरपरिषदेतील कर वसुलीत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. नागरिकांकडून मालमत्ता कर, घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम स्वीकारून ती शासनाकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दि. १५/०३/२०२२ ते दि. २२/०७/२०२६ या दरम्यान फलटण नगरपरिषदेतील कर्मचारी
१) प्रदीप अरुण काकडे, २) नितीन देवदास वाळा व ३) शरद माधव अहिवळे, सर्व रा. फलटण, ता. फलटण यांनी फलटणमधील नागरिकांकडून वेळोवेळी मालमत्ता कर, घरपट्टी व पाणी पट्टीची रक्कम स्वीकारली.
परंतु ही रक्कम शासनाकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १,५०,३९९ रुपयांचा अपहार करून फलटण नगरपरिषदेची व मालमत्ता धारकांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी नगरपरिषदेचे सहा. कर निरीक्षक श्री. जगदीश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक २८/०७/२०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री. मितू जगदाळे हे करीत आहेत.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
ज्या नागरिकांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेमध्ये मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी किंवा इतर कोणताही कर भरला असेल, परंतु अधिकृत पावती मिळाली नसेल अथवा फसवणूक झाल्याची शंका असल्यास आणि वरील व्यवहाराबाबत फसवणूक झाली असल्यास त्याबाबत पोलीस ठाण्यास तक्रार नोंदवावी अथवा खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक :
श्री. घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे - ९८८११९४६०१
श्री. मितू जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फलटण शहर - ९०२११९६०२२

Post a Comment
0 Comments